
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण शहरातील महात्मा फुले चौकात आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या बालिकेला अज्ञात प्राण्याने उचलून नेऊन तिचा बळी घेतल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ नोव्हेंबर : फलटण शहरातील महात्मा फुले चौक परिसरात आई-वडिलांसोबत झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेला एका अज्ञात प्राण्याने उचलून नेऊन तिचा जीव घेतल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाठार फाटा येथील कुटुंबावर काळाचा घाला
वाठार फाटा (ता. फलटण) येथील रहिवासी असलेले मयूर मुन्ना शिंदे (वय २२) आणि त्यांची पत्नी ऋतुजा हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. सातारा येथून परत आल्यानंतर ०६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते फलटण शहरातील महात्मा फुले चौकातील एका आईस्क्रीमच्या गाड्याजवळ आपल्या तीन महिन्यांच्या मुलीसोबत झोपले होते. ०७ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ऋतुजा यांना जाग आली तेव्हा त्यांची मुलगी जागेवर दिसली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता, एका कुत्र्याच्या तोंडात त्यांना त्यांची लहान मुलगी दिसली.
कुत्र्याला पिटाळून लावले, पण…
मुलीला पाहताच मयूर शिंदे यांनी तात्काळ कुत्र्याला दगड मारून पिटाळून लावले, त्यामुळे कुत्र्याने बालिकेला खाली सोडले. मात्र, जवळ जाऊन पाहिले असता बालिकेच्या मानेपासून डोक्याकडचा भाग आणि एक हात व एक पाय गायब असल्याचे विदारक दृश्य त्यांना दिसले. अंधारात त्यांनी डोके आणि इतर अवयव शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुठेही मिळून आले नाहीत. अज्ञात प्राण्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.





