श्रीराम साखर कारखान्याबाबत राज्य शासनाचे महत्त्वाचे निर्देश; धोरणात्मक निर्णयांना स्थगिती


खाजगी कंपनीला कारखाना चालवण्यास देण्याच्या प्रस्तावावरील सभेनंतरच्या घडामोडी; नवीन मंडळ येईपर्यंत साखर आयुक्तांना शासनाचे निर्देश प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती.

स्थैर्य, फलटण, दि. 28 मे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली असल्याने, जोपर्यंत नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत कारखान्याबाबत कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यास, नूतनीकरण करण्यास किंवा कारखाना नव्याने कोणाला चालवण्यास देण्यास राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते. याबाबत शासनाच्या वतीने साखर आयुक्तांना निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष सर्वसाधारण सभेतील विरोधाची पार्श्वभूमी

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखाना ‘श्री दत्त इंडिया’ या खाजगी साखर कारखान्याला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यासाठी एक विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. ही सभा कमालीची वादळी ठरली होती. कारखान्यात सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी मंडळींना अनेक वर्षात पहिल्यांदाच कारखान्याच्या सभेत एवढ्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विरोधी सभासदांनी श्रीराम कारखाना खाजगी कंपनीला देण्याच्या विषयाला जोरदार विरोध नोंदवला होता. या मोठ्या गदारोळानंतर आणि विरोधानंतर आता थेट राज्य सरकारनेच या प्रक्रियेला ब्रेक लावला असल्याचे बोलले जात आहे.

साखर आयुक्तांना राज्य सरकारचे निर्देश!

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने साखर आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन कार्यकारी मंडळ येईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात यावेत, तसेच कारखान्याचे नूतनीकरण किंवा तो नव्याने चालवायला देण्याच्या प्रक्रियेस सद्यस्थितीत स्थगिती द्यावी, असे या निर्देशांमध्ये नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घडामोडींमुळे फलटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. खाजगी कंपनीला कारखाना चालवायला देण्याच्या प्रक्रियेत सध्या तरी खंड पडल्याचे चित्र आहे. आता श्रीराम कारखान्याची आगामी निवडणूक पार पडून नवीन संचालक मंडळ कार्यभार स्वीकारेल, त्यानंतरच कारखान्याच्या पुढील धोरणात्मक आणि व्यवस्थापकीय कामांबाबत कायदेशीर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!