सातारची ‘अजिंक्यकन्या’ धैर्या कुलकर्णीची गगनभरारी; खडतर ‘युनाम’ शिखर केले सर


स्थैर्य, सातारा , दि. 7  जून : अवघ्या १४ वर्षांच्या धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने गिर्यारोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, नुकतेच तिने हिमाचल प्रदेशातील ६,१११ मीटर (२०,०४९ फूट) उंचीचे अतिशय आव्हानात्मक असे ‘युनाम शिखर’ यशस्वीपणे सर केले आहे.

धैर्याने २२ मे रोजी ही मोहीम सुरू केली आणि ५ जून रोजी ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेली. विशेष म्हणजे, याआधी तिला खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे ‘फ्रेंडशिप शिखर’ मोहीम अवघ्या ३०० ते ४०० मीटर अंतरावरून सोडावी लागली होती. मात्र, या अपयशाने न खचता तिने लगेचच त्याहून अधिक उंचीचे आणि खडतर असे ‘युनाम शिखर’ सर करण्याचे धाडस दाखवत आपली जिद्द सिद्ध केली आहे.

धैर्याने सर केलेली प्रमुख शिखरे व मोहिमा:

  • एव्हरेस्ट बेस कॅम्प: वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ५,५४५ मीटर उंचीचा टप्पा पालकांशिवाय पूर्ण करणारी ती बहुदा देशातील एकमेव अल्पवयीन मुलगी ठरली आहे.

  • माऊंट किलीमंजारो: आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर (५,८५० मीटर) उणे तापमानात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने सर केले.

  • माऊंट एलब्रुस: युरोप खंडातील सर्वोच्च शिखर (५,६४२ मीटर) काही महिन्यांपूर्वीच तिने यशस्वीपणे सर केले.

  • याव्यतिरिक्त कळसूबाई, गिरनार, सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले आणि नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा तिने यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

पार्श्वभूमी व मार्गदर्शन:

साताऱ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता नववीत शिकणारी धैर्या ही सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची कन्या आहे. या मोहिमांसाठी तिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ, डॉ. सुरभी लिऊआ, तसेच प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबले  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गेली सहा वर्षे ती सातत्याने ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचा सराव करत आहे.

‘धरासे चढकर गगन को छुआ’ या उक्तीप्रमाणे धैर्याने केलेल्या या असामान्य कामगिरीबद्दल तिच्या आई-वडिलांसह संपूर्ण साताऱ्यातून आणि गिर्यारोहण क्षेत्रातून तिचे मोठे कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!