फलटण: जखमी वारकरी महिलेवर उपचारास नकार – रुग्णालयावर संताप

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गंभीर जखमी वारकरी महिलेला फलटणमधील खासगी रुग्णालयाने उपचारास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले.

स्थैर्य, फलटण, दि. 20 जुलै : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान नातेपुते येथे पडून गंभीर जखमी झालेल्या एका महिला वारकरीला फलटणमधील खासगी रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका समाजसेवकाच्या मध्यस्थीने दुसऱ्या रुग्णालयात तातडीने उपचार मिळाल्याने या महिलेचे प्राण वाचले असले, तरी वारकरी संप्रदायामध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयाकडून उपचारास नकार

गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास समाजसेवक सचिन गानबोटे यांना रिंगरोड परिसरात एक रुग्णवाहिका दिसली. त्यात दिंडी क्रमांक दोनमधील उषा रमेश जठार (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा) या महिला वारकरी बेशुद्ध अवस्थेत होत्या. नातेपुते येथे पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णवाहिका चालकाने त्यांना लाईफ लाईन रुग्णालयात नेले होते. मात्र, तेथील पलाश कांबळे यांनी रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. बाहेर जाऊन कालवा करा, अशा शब्दांत त्यांनी रुग्णाला परत पाठवल्याचा आरोप रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी केला.

वेळेवर उपचाराने वाचले प्राण

ही माहिती मिळताच सचिन गानबोटे यांनी रुग्णवाहिका थेट जे. टी. हॉस्पिटलकडे नेली आणि जे. टी. पोळ यांच्याशी संपर्क साधला. रुग्णालयात पोहोचताच पोळ यांनी महिलेची तपासणी करून सीटी स्कॅन करण्याचे निर्देश दिले. अहवालात मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे या महिला वारकरीचे प्राण वाचले.

प्रशासनाची अनास्था आणि कारवाईची मागणी

गंभीर जखमी रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार अभिजीत जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची ही अनास्था संतापजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयात अपघातग्रस्तांना त्वरित उपचारासाठी दाखल करून घेणे बंधनकारक असताना, पलाश कांबळे यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक आणि वारकरी संघटना करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!