
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या आव्हानानुसार गजानन चौकात एकटेच एन्ट्री केली. त्यानंतर आमदार सचिन पाटील यांनीही तिथे उपस्थिती लावली.
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलेल्या आव्हानानुसार पोलीस संरक्षणाविना गजानन चौकात एकटेच एन्ट्री केली. ते गेल्यानंतर आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांसोबत तेथे उपस्थिती लावली.
पोलीस संरक्षणाविना गजानन चौकात दाखल
पत्रकार परिषदेत दिलेल्या आव्हानानुसार रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणत्याही पोलीस फौजफाट्याशिवाय रात्री साडेनऊ वाजता गजानन चौकात पोहोचले. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असली तरी त्यांना दूर राहण्याचे आवाहन करत निंबाळकर यांनी स्वतः बुलेटवरून चौकात फेरफटका मारला. यावेळी ते अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
विरोधकांवर घणाघाती टीका
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ज्यांनी आव्हान दिले, त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी इथे यायला पाहिजे होते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा ठराविक कार्यकर्त्यांसोबत काही काळ गजानन चौकात येऊन बसले होते.
