फलटणमधील सराईत टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार

फलटण शहर व परिसरात चोरी, खंडणी आणि दहशत माजवणाऱ्या १० सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सहा महिन्यांसाठी हद्दपार करून मोठी कारवाई केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटण शहर व परिसरात चोरी, जबरी चोरी, खंडणी आणि बेकायदा शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या १० सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. सातारा जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून या टोळीला तडीपार करण्यात आले आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल

फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळी प्रमुख तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे याच्यासह त्याच्या इतर नऊ साथीदारांनी अनेक गंभीर गुन्हे केले होते. पोलिसांकडून वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. नागरिकांमध्ये या टोळीची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून सातत्याने होत होती.

पाच तालुक्यांमधून केले हद्दपार

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासमोर या टोळीच्या हद्दपारीची सुनावणी पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये या संपूर्ण टोळीला सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धडक कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुन्हेगारांवर मोहीम सुरूच राहणार

आगामी काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी तसेच मोक्कासारख्या कडक कारवाया करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी केली होती. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Back to top button
Don`t copy text!