फलटण: नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये १२ टक्के पाणीसाठा – पावसाची प्रतीक्षा


नीरा उजवा कालवा विभागाच्या अहवालानुसार नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत १२.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ जून : नीरा उजवा कालवा विभागाच्या ताज्या अहवालानुसार नीरा प्रणालीतील धरणांमध्ये सद्यस्थितीत एकूण ५.९५ टीएमसी म्हणजेच १२.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी फलटणकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून गेल्या दोन दिवसांपासून फलटण शहर व तालुक्यात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झाले आहे. फलटण शहर आणि तालुक्यात पडत असलेला हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दमदार पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही.

धरणांमधील सद्यस्थिती आणि मागील वर्षाशी तुलना

नीरा प्रणालीमध्ये भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चार धरणांचा समावेश होतो. या धरणांची एकूण साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी इतकी आहे. सद्यस्थितीत भाटघर धरणामध्ये १.८७ टीएमसी (७.९६ टक्के), वीर धरणामध्ये २.२४ टीएमसी (२३.८० टक्के), नीरा देवघर धरणामध्ये १.१५ टीएमसी (९.८० टक्के) तर गुंजवणी धरणामध्ये ०.६९ टीएमसी (१८.७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. वीर धरण परिसरात नव्याने २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षी याच दिवशी नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये एकूण ७.६४ टीएमसी म्हणजेच १५.८३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा चारही धरणांमध्ये मिळून केवळ १२.३१ टक्के साठा उरला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वेगाने खालावला आहे.

वीजनिर्मिती आणि कालवा विसर्ग

सध्या नीरा देवघर धरणामधून वीजनिर्मितीसाठी १२०० क्युसेक्स, तर गुंजवणी धरणामधून १३० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा डावा कालव्यातून ८२७ क्युसेक्स तर नीरा उजवा कालव्यातून १४४४ क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत उजव्या कालव्यातून १२.७३ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!