

फलटण शहरातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा ‘श्रीगणेशा’ मलठण येथून होणार असून, व्यावसायिकांना अतिक्रमणे स्वतःहून हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मे : फलटण शहरातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेगाने सुरू आहे. या कामात अडथळा ठरणारी रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व कच्ची, पक्की तसेच अनधिकृत वाढीव बांधकामे आणि अतिक्रमणे आता तातडीने काढण्याचे कामकाज फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या धडक कारवाईचा ‘श्रीगणेशा’ मलठण येथूनच होणार आहे.
स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कारवाई
या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच विविध वृत्तपत्रांतून जाहीर सूचना आणि आवाहन प्रसिद्ध करत नागरिकांना व व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे. रस्त्याच्या बाजूस अतिक्रमण केलेले दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारक आणि हातगाडीधारक यांनी आपली अतिक्रमणे येत्या सात दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत. दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास नगरपरिषदेच्या पथकामार्फत ती काढण्यात येतील. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस संबंधित व्यावसायिक आणि नागरिक स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
‘या’ मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश:
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खालील मार्गांवरील अतिक्रमणे तातडीने काढणे आवश्यक आहे:
-
गिरवी नाका ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा
-
श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गजानन चौक
-
गजानन चौक ते पाचबत्ती चौक
-
पाचबत्ती चौक ते उब्रेश्वर चौक
-
उब्रेश्वर चौक ते जिंती नाका
-
डेक्कन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
-
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक
-
नाना पाटील चौक ते श्रीराम कारखाना
पालखी सोहळा जवळ येत असल्याने नगरपरिषदेने रस्ते मोकळे करण्याची ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या कामात प्रशासनाला सहकार्य करावे, असे अपेक्षित आहे.
