
श्रीराम कारखान्याबाबत सरकारला सहा आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितल्याचे वृत्त ‘स्थैर्य’ने आधीच दिले होते. अधिकृत आदेशातही ही बाब स्पष्ट झाली.
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : पत्रकारितेमध्ये केवळ घाई करण्यापेक्षा ‘अचूक’ आणि ‘सत्य’ बातमी देण्यावर दैनिक ‘स्थैर्य’ने नेहमीच भर दिला आहे. पोलीस दलातील बदल्या, पंचायत समिती निवडणुका आणि श्रीराम कारखान्याबाबत ‘स्थैर्य’ने दिलेल्या सर्व बातम्या राज्य शासन व न्यायालयाच्या निर्णयांमधून तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. यामुळे फेक न्यूजच्या काळात वाचकांची दिशाभूल न करता सत्य मांडणारे ‘स्थैर्य’ हे विश्वासाचे आणि फलटण तालुक्यात नंबर १ चे न्यूज पोर्टल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
श्रीराम कारखान्याच्या घडामोडींवर सातत्याने लक्ष
श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबतच्या महत्त्वाच्या घडामोडी ‘स्थैर्य’ने यापूर्वीही वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. कारखान्यावर प्रशासक नियुक्त केला जाणार असल्याची माहिती ‘स्थैर्य’ने राज्यात सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत प्रशासकाऐवजी पूर्वीच्या संचालक मंडळाला काही अटी व शर्तींसह पुढील निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे वृत्तही ‘स्थैर्य’ने दिले होते.
आता श्रीराम कारखान्याशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या न्यायालयीन घडामोडीची माहिती ‘स्थैर्य’ने आदेश समोर येण्यापूर्वीच वाचकांपर्यंत पोहोचवली. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या विषयावर सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्यास न्यायालयाने राज्य शाशनाकडे विनंती केली असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर समोर आलेल्या आदेशामुळे या वृत्तातील मुख्य बाब स्पष्ट झाली आहे.
पोलीस बदल्यांचे वृत्तही ठरले अचूक
राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही ‘स्थैर्य’ने २० एप्रिल रोजी महत्त्वाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच राज्याच्या गृह विभागाकडून बदल्यांबाबत निर्णय समोर आला. त्यामुळे ‘स्थैर्य’ने आधी दिलेल्या माहितीला अधिकृत निर्णयातून पुष्टी मिळाली होती.
जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही आधीच दिले होते संकेत
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमाबाबतही ‘स्थैर्य’ने प्रशासकीय हालचालींचा वेध घेत वृत्त दिले होते. १३ जानेवारी रोजी निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला होता. त्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद निश्चित झाल्याने ‘स्थैर्य’ने दिलेल्या वृत्तातील संकेत पुढील घडामोडींमधून स्पष्ट झाले.
फलटण नगरपरिषद निवडणुकीतही ‘स्थैर्य’चे वृत्त ठरले खरे
फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकांच्या कार्यक्रमात बदल होण्याबाबतही ‘स्थैर्य’ने २८ नोव्हेंबरलाच वृत्त दिले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान निश्चित करण्यात आले होते.
या घडामोडीदरम्यान प्रशासकीय संदेशाच्या आधारे निवडणूक पुढे जाणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ‘स्थैर्य’ने अधिकृत निर्णयाची भूमिका कायम ठेवली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकृत आदेश समोर आल्यानंतर ‘स्थैर्य’ने दिलेली माहिती अचूक ठरली.
वेगापेक्षा विश्वासाला प्राधान्य
डिजिटल माध्यमांमध्ये बातमी लवकर प्रसिद्ध करण्याला महत्त्व असले तरी अपूर्ण किंवा खात्री नसलेली माहिती प्रसिद्ध झाल्यास वाचकांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ‘स्थैर्य’ने महत्त्वाच्या प्रशासकीय, राजकीय, निवडणूक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींमध्ये खात्रीशीर माहितीच्या आधारे वृत्त देण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
श्रीराम कारखान्याबाबतच्या ताज्या घडामोडीसह यापूर्वी पोलीस बदल्या, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका आणि फलटण नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात ‘स्थैर्य’ने आधी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांना नंतर अधिकृत निर्णय किंवा आदेशातून पुष्टी मिळाली. ‘सर्वप्रथम’च्या स्पर्धेत वाचकांची दिशाभूल न करता अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्यालाच ‘स्थैर्य’ने प्राधान्य दिले आहे.