
पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्याला काशीदवाडी (ता. फलटण) येथे मारहाण करून ७० हजार रुपये लुटल्याप्रकरणी सहा दिवसांनंतर अज्ञातांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 13 जुलै : पंढरपूरहून पुण्याकडे परत येत असताना काशीदवाडी (ता. फलटण) नजीक विश्रांतीसाठी थांबलेल्या एका वारकऱ्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी घटनेच्या सहा दिवसांनंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री वारकऱ्यांवर भ्याड हल्ला
त्रंबक अश्रुबा कोळेकर (वय ७२, रा. मोरवड, ता. वडवणी, जि. बीड) हे आषाढी वारीनंतर पंढरपूरहून पुण्याकडे परतत होते. मध्यरात्री ते पुणे-पंढरपूर महामार्गावर काशीदवाडी येथे विश्रांतीसाठी थांबले होते. ६ जुलै रोजी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक करत तेथे गोंधळ निर्माण केला.
७० हजारांची रोकड पळवली
दगडफेकीत आणि मारहाणीत वारकरी बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्रंबक कोळेकर यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. या पाकिटामधील ७० हजार रुपयांची रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
सहा दिवसांनंतर अखेर कारवाई
घटनेनंतर त्वरित डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, गंभीर दुखापत आणि प्रवासात असल्यामुळे त्यावेळी कोळेकर यांना अधिकृत तक्रार नोंदवता आली नाही. त्यानंतर त्यांनी सासवड येथून याबाबत रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार १२ जुलै रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत.