
दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२६ | सातारा |
यूट्यूबवर वेब सिरीज बनवून त्यातून प्रकाशझोतात आलेला एक सातार्यातील तरुण चक्क दारू तस्कर निघाल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आले. एवढेच नव्हे तर त्याने व त्याच्या मित्राने दारूसाठी एका ठिकाणी चक्क गोडावून तयार केले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी दोघांकडून एकूण ७ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, नितीन जाधव यांचे भरारी पथक सातार्यातील एमआयडीसीमध्ये स्वातंत्र्यदिनी गस्त घालत होते. त्यावेळी सूरज चव्हाण (वय ३२, रा. एकंबे, ता. कोरेगाव) व शफिक मोमीन (वय ३४, रा. निनाम पाडळी, ता. सातारा) हे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवरून जात असताना भरारी पथकाला सापडले. दोघेही दारू तस्करी करतात, याची माहिती अगोदरच भरारी पथकाला मिळाली होती. पथकाने दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर अधिकारीही अचंबित झाले.
यातील संशयित शफिक मोमीन हा यूट्यूबर आहे. त्याने वेब सिरीज मालिका तयार केली आहे. झटपट पैशाच्या आमिषाने दारू तस्करीत ओढला गेला. मित्राच्या सोबतीने त्याने गोडोली येथे दारू साठविण्यासाठी चक्क गोडावून तयार केले होते. या गोडावूनमधूनच हे दोघे बिअरबारला दारू विकत होते. त्यांनी नागठाणे, ता. सातारा येथील हॉटेलला दारू विकल्याची कबुली दिली. गोवा बनावटीची दारू हे दोघे बेकायदा विकत होते, असेही उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या चौकशीत समोर आले.
