
रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याने श्री जितोबा विद्यालयात संगणक संच भेटीसह आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन व वैज्ञानिक जागृती उपक्रम राबविले.
स्थैर्य, जिंती, दि. २६ ऑगस्ट : रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जिंती येथील श्री जितोबा विद्यालयाला संगणक संच भेट देण्यात आला. बदलत्या काळात एआय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हा संगणक देण्यात आला. याचवेळी आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन आणि वैज्ञानिक जाणीव जागृतीचे उपक्रम घेण्यात आले.
२०० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
आरोग्य तपासणी शिबिरात विद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकिता गांधी आणि डॉ. सई खराडे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
प्लास्टिक निर्मूलनाची घेतली शपथ
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. महेश बर्वे यांनी प्लास्टिकचा वापर टाळणे, प्लास्टिक निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेतली.
वैज्ञानिक प्रयोगांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रोटरी क्लबचे सचिव सुधीर इंगळे यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासह अंधश्रद्धेविरोधात विवेकपूर्ण विचार रुजविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ फलटणचे संस्थापक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. महेश बर्वे, राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, चंद्रकांत रणवरे, शरदराव रणवरे, विनायकराव रणवरे, शरदसर रणवरे, जगदेवराव रणवरे, माधुरी जाधव आणि ताराचंद्र आवळे यांच्यासह ग्रामस्थ, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले. अंकुश सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नवनाथ रणवरे, प्रणव रणवरे, रणजित रणवरे आणि विद्यालयातील शिक्षकांनी सहकार्य केले.
