
फलटण नगरपरिषदेतील कर घोटाळा उघड झाल्यानंतर वसुली विभाग सील करण्यात आला आहे. नागरिक स्वतःहून तक्रारी करत असून एकाने थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 14 जुलै : फलटण नगरपरिषदेच्या वसुली विभागातील मालमत्ता कराचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर आता रोज नवनवीन धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. फसवणूक झालेले नागरिक आता स्वतःहून पुराव्यानिशी पुढे येत आहेत. या वाढत्या तक्रारी आणि गंभीर प्रकारांची दखल घेत नगरपरिषदेचा संपूर्ण वसुली विभाग सील करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक विभागप्रमुख माळी यांनी दिली आहे.
धनादेशाच्या रकमेत मोठी तफावत
लक्ष्मी नगर येथील नागरिक विजय सुरेश मलाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मार्च २०२२ मध्ये १ लाख ३८ हजार २६२ रुपयांचा धनादेश कर भरण्यासाठी दिला होता. हा धनादेश नगरपरिषदेच्या खात्यात जमा होऊनही त्यांना केवळ १ लाख २१ हजार ८६३ रुपयांची पावती देण्यात आली. उर्वरित १६ हजार ३९९ रुपयांची पावती ‘संगणकीय त्रुटी’चे कारण देत गेली चार वर्षे देण्यात आलेली नाही. यामुळे आपला मोठा मानसिक छळ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परस्पर अपहार आणि आत्मदहनाचा इशारा
अय्याज इक्बाल कोतवाल या दुसऱ्या एका नागरिकाने नगरपरिषदेच्या कारभाराला कंटाळून थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या मिळकतीच्या करापोटी २० हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, ही रक्कम त्यांच्या नावावर जमा न करता, दुसऱ्याच मिळकतीच्या नावे जमा केल्याचे चुकीचे उत्तर त्यांना प्रशासनाकडून देण्यात आले. या रकमेचा परस्पर अपहार झाल्याचा संशय त्यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाची शक्यता
पुढील आठ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पावती न मिळाल्यास २१ जुलै रोजी आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा कोतवाल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नागरिकांच्या या वाढत्या तक्रारींमुळे वसुली विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट होत आहे. आता संपूर्ण विभाग सील झाल्याने या प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.