
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून दिवाळीची खास भेट दिली.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने स्वखर्चातून दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला. तसेच सर्व महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सौ. मनिषा नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या भेटींचे वाटप करण्यात आले.
शहराच्या विकासामागील हातांचा सन्मान
रस्ते स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यामागे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे मोठे कष्ट असतात. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ते शहराची व्यवस्था सुरळीत ठेवतात. अनेकदा सण-उत्सवांच्या दिवशीही त्यांना कर्तव्य बजावावे लागते. त्यांच्या या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही स्नेहभेट देण्यात आल्याची भावना सौ. मनिषा नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
महिला कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव
नगरपरिषदेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात साडी आणि फराळ देऊन सन्मान करण्यात आला. घरातील जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामकाज निष्ठेने सांभाळणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. कर्मचाऱ्यांनाही कुटुंबाचा एक भाग मानले जावे, यातून त्यांचा आनंद द्विगुणित होतो, असे सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी यावेळी नमूद केले.





