कृत्रीम बुद्धिमत्तेचा स्वीकार करून स्मार्ट व शाश्वत शेतीकडे फलटणची वाटचाल : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२६ | फलटण |
शेती क्षेत्रातील वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान, मजुरांची कमतरता आणि पिकांच्या उत्पादनातील अनिश्चितता यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक अचूक, कार्यक्षम, उत्पादनक्षम व शाश्वत करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा शुभारंभ करून स्मार्ट व शाश्वत शेतीकडे फलटणची वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

‘शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा शुभारंभ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन डिजिटल खेती पुणे, गोविंद फाउंडेशन फलटण, फार्मर्स फॉर फॉरेस्ट पुणे आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी फलटण पंचक्रोशीतील शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. कृषी क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आणि शेतकर्‍यांनी पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील शेती ही अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित होत असून त्यासाठी कृषी शिक्षण संस्था आणि शेतकरी यांच्यातील संवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘डिजिटल खेतीद्वारे शेतीतील कृत्रीम बुद्धिमत्ता’ या विषयावर मार्गदर्शन करताना विजय सांगळे यांनी कृत्रीम बुद्धिमत्ता ही केवळ उद्योग क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आता कृषी क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले. एआय आणि डिजिटल साधनांच्या मदतीने पिकांचे निरीक्षण, रोग-किडींची ओळख, हवामानाचा अंदाज, पाणी व खत व्यवस्थापन, उत्पादनाचा अंदाज, जमिनीची माहिती आणि शेतीविषयक निर्णय घेणे अधिक अचूकपणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल अ‍ॅप्स, ड्रोन, सेन्सर्स, उपग्रह प्रतिमा आणि डेटा आधारित तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाची गुणवत्ता व नफा वाढविण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. ‘शेतकर्‍यांनी तंत्रज्ञानाला घाबरून न जाता ते समजून घेऊन आपल्या शेतीमध्ये वापरले पाहिजे. भविष्यातील शेती ही डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल,’ असा महत्त्वपूर्ण संदेशही यावेळी त्यांनी दिला.

फार्मर्स फॉर फॉरेस्ट, पुणेचे शुभम गुरव यांनी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेचे शेतकर्‍यांसाठी कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढविताना पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेती, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण यांचा समतोल साधून शाश्वत कृषी विकासाची दिशा निश्चित करता येते. शेतकर्‍यांनी उत्पादनाबरोबरच माती, पाणी, जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास शरदराव रणवरे (व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती), आर. एच. पवार (सदस्य, महाविद्यालयीन समिती), रणजित निंबाळकर (सदस्य, महाविद्यालयीन समिती), डॉ. शांताराम गायकवाड (गोविंद फाउंडेशन), डॉ. यु. डी. चव्हाण (प्राचार्य, कृषी महाविद्यालय, फलटण) यांची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन कु. शिवम काकडे व कु. सृष्टी झाडोकर यांनी केले. डॉ. जी. बी. अडसूळ यांनी आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!