निरगुडीत ‘तक्षशिला बुद्ध विहारा’चे नामकरण; बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याने धम्मकार्याची नवी सुरुवात

निरगुडी (ता. फलटण) येथे नूतन ‘तक्षशिला बुद्ध विहारा’चे नामकरण आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भंते कश्यपजी यांनी उपस्थितांना धम्मविचार आणि सामाजिक परिवर्तनाबाबत मार्गदर्शन केले.

स्थैर्य, निरगुडी, दि. 18 ऑगस्ट : निरगुडी (ता. फलटण) येथे भारतीय बौद्ध महासभा आणि सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन ‘तक्षशिला बुद्ध विहार’ नामकरण आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला.

धम्मरॅली आणि नामकरण सोहळा

पंचशील ध्वजारोहणानंतर गावातून बुद्धमूर्तीची धम्मरॅली काढण्यात आली. त्रिशरणाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता. नूतन बुद्ध विहाराचे ‘तक्षशिला बुद्ध विहार’ असे नामकरण करून भंते कश्यपजी यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सामाजिक परिवर्तनाचा जागर

भंते कश्यपजी यांनी धम्मदेशना देताना सांगितले की, बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केवळ धार्मिक विधी न राहता त्यातून सामाजिक परिवर्तनाचा जागर झाला पाहिजे. भगवान बुद्धांच्या अनित्यतावादाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा दाखला देत त्यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली. वैयक्तिक दुःखाचे रूपांतर सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पात कसे करता येते, याचा आदर्श बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो, असे ते म्हणाले.

धम्मकार्याला गती देण्याचे आवाहन

समता सैनिक दलाचे राज्य संघटक दादासाहेब भोसले यांनी निरगुडी येथे नियमित धम्मशिबिरे आणि उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. सोमीनाथ घोरपडे यांनी धम्मकार्यातील निरगुडीच्या योगदानाचा गौरव केला. बुद्धमूर्तीचे दाते तुषार मोहिते यांनी या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत मोहिते, विठ्ठल निकाळजे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!