
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानंतर मलठणमधील अंतर्गत रस्त्याचे काम पुन्हा वेगाने सुरू झाले असून, शहरातील रस्ते जाळे अधिक मजबूत होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २६ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त थांबवण्यात आलेले फलटण शहरातील मलठण येथील अंतर्गत पालखी मार्गाचे काम पुन्हा एकदा वेगाने सुरू करण्यात आले आहे. पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्यानंतर श्री संत हरिबाबा मंदिर परिसरापासून या रस्ते कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
रस्त्याचे जाळे होणार मजबूत
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून फलटण शहरासाठी अंतर्गत पालखी महामार्ग मंजूर करण्यात आला होता. या महामार्गाचे प्रत्यक्ष काम आता वेगात सुरू असून, यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत आणि दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
पाचबत्ती चौक परिसरातील काम बाकी
सध्या शहरातील गजानन चौक ते पाचबत्ती चौक आणि हरिबाबा मंदिर ते पाचबत्ती चौक या मुख्य टप्प्यांमधील काम प्रामुख्याने शिल्लक आहे. याशिवाय शहरात काही ठिकाणी उर्वरित पॅचचे काम राहिले असून तेही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.