
दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
राज्यातील ज्या शेतकर्यांची नावे सातबारा उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकर्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकर्यांचा ‘अॅग्रीस्टॅक’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकार्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.
मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर, महसूल व सहकार व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये सध्या तब्बल २ लाख ३१ हजार शेतकर्यांचे ’अॅग्रीस्टॅक’ निघत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. राज्यात सुमारे ५० हजार शेतकरी मयत आहेत, ज्यांच्या नोंदी अद्ययावत नाहीत.१० हजार प्रकरणांमध्ये जमीन वडिलांच्या नावे असून, मुलाचे नाव अद्याप सातबारावर लागलेले नाही. शेतकर्यांना देण्यात आलेल्या ’कबुलायतदार’ जागांवर सरकारचे नाव लावण्यात आले आहे. परिणामी, अशा शेतकर्यांना पीककर्ज मिळत नाही आणि घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीचा लाभही मिळत नाही. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,२०७ शेतकर्यांचे ‘फार्मर आयडी’ अद्याप निघालेले नाहीत. तर राज्यातील ही संख्या २ लाख ३१ हजार आहे.
या सर्व अडचणींची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. “जे शेतकरी आहेत, परंतु त्यांचे नाव सातबारा किंवा इतर अधिकारात नाही, अशा शेतकर्यांच्या जमिनीची सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठविण्यात येतील. यासाठी एक स्वतंत्र फॉरमॅट तयार करून सर्व जिल्हाधिकार्यांकडून १५ दिवसांत अहवाल मागविण्यात यावा,” असे निर्देश त्यांनी दिले आहेत. लवकरच जिल्हाधिकार्यांची बैठक घेऊन याबाबतचे अंतिम आदेश निर्गमित केले जातील.
ज्या शेतकर्यांकडे देवस्थान, कबुलायतदार, इनाम किंवा वतन जमिनी आहेत, त्यांनाही सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने एक विशेष फॉर्म तयार करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात या शेतकर्यांनाही ’अॅग्रीस्टॅक’ काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, पात्र शेतकर्यांची यादी लावण्यात आली असून, ज्यांचे अॅग्रीस्टॅक निघू शकत नाही, त्यांच्याकडून इतर पर्यायी कागदपत्रे घेऊन मार्ग काढण्यात येईल.
