फलटणकरांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ७ सप्टेंबरला भव्य ‘जनता दरबार’! तक्रार अर्ज जमा करण्याचे आमदार सचिन पाटील यांचे आवाहन

फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी ७ सप्टेंबरला जनता दरबार भरणार आहे. नागरिकांनी २५ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागांत प्रलंबित असलेल्या समस्यांचे आणि तक्रारींचे एकाच छताखाली निराकरण करण्यासाठी एका भव्य ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी हा तालुकास्तरीय जनता दरबार भरणार आहे.

सर्व शासकीय अधिकारी राहणार एकाच छताखाली उपस्थित

सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी हा तालुकास्तरीय जनता दरबार महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत हा जनता दरबार पार पडेल. या दरबारात सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामांचा निपटारा जलद गतीने होण्यास आणि त्यांना न्याय मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे.

२५ ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन

ज्या नागरिकांना आपल्या प्रलंबित समस्या या जनता दरबारात मांडायच्या आहेत, त्यांनी आपल्या तक्रारीचे अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आगाऊ जमा करणे गरजेचे आहे. हे तक्रार अर्ज आजपासून ते मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

तरी फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विहित वेळेत आपले अर्ज खालील पत्त्यावर जमा करावेत आणि या जनता दरबारच्या माध्यमातून आपल्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे जाहीर आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.

हे अर्ज आमदार सचिन पाटील यांच्या महाराजा मंगल कार्यालयाजवळील जनसंपर्क कार्यालयात स्वीकारले जाणार असून, नागरिकांनी विहित वेळेत अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!