फलटण: पत्रकारिता समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम; पोपटराव मिंड यांचे प्रतिपादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांनी पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर मार्गदर्शन केले.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी : समाजातील सत्य निर्भीडपणे मांडण्याचे आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रभावी कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांनी केले. फलटण येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय, फलटण येथे ६ जानेवारी रोजी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मिंड यांनी पत्रकारितेचे महत्त्व आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाची सुरुवात पोपटराव मिंड यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना मिंड म्हणाले की, जांभेकरांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील अज्ञान दूर करण्याचे आणि वास्तव लोकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

इंग्रजांच्या काळात त्यांनी आपल्या लेखणीतून समाजप्रबोधन व स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. हाच वैचारिक वारसा आजचे पत्रकार पुढे नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. रोहित अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमास महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, महादेवराव गुंजवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, बापूराव जगताप, यशवंत खलाटे-पाटील, विशाल शहा, सचिन मोरे, अशोक सस्ते, सतीश कर्वे, शक्ती भोसले, आनंदा पवार, काकासाहेब खराडे, योगेश गंगतीरे, अनमोल जगताप, शकील सय्यद, राजेंद्र गोडसे, यशराज भांबुरे उपस्थित होते.

तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!