
फलटण तालुक्याच्या जनता दरबारात नागरिकांच्या अर्जांवर विभागनिहाय सुनावणी घेण्यात आली. बहुतांश अर्ज निकाली काढत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
स्थैर्य, फलटण, दि. ८ सप्टेंबर : फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित शासकीय समस्या सोडवण्यासाठी फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय ‘जनता दरबार’ मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दरबारात बहुतांश अर्जांवर जागेवरच सुनावणी घेऊन ते निकाली काढण्यात आले. शासकीय प्रश्न मार्गी लागल्याने सर्वसामान्य नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले.
“तक्रार करण्याची वेळच येऊ नये, हेच आदर्श काम” – रणजितदादा
यावेळी नागरिकांशी व प्रशासनाशी संवाद साधताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत मार्मिक अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “फलटण-कोरेगावच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्यातूनच आपण हे जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक पाहता, सर्व शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी इतके आदर्शवत काम करावे की, सामान्य माणसाला जनता दरबारात आपली तक्रार मांडण्याची वेळच येऊ नये. फलटणमधील सर्वच विभागांचे अधिकारी चांगले काम करत आहेत, पण त्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. आम्हाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होईल, जेव्हा जनता दरबार आयोजित करूनही त्यामध्ये एकही तक्रार अर्ज दाखल होणार नाही.”
अधिकाऱ्यांनी प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावावेत – आ. सचिन पाटील
आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. “रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर आहोत. नागरिक मोठ्या आशेने जनता दरबारात अर्ज देतात, त्यावर अधिकाऱ्यांनी उचित आणि तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. अर्ज केवळ प्रलंबित न ठेवता, नागरिकांच्या समस्या मुळापासून जाणून घेऊन त्यावर यशस्वी तोडगा काढणे हे अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
प्रशासकीय समन्वय आणि उपस्थिती
या जनता दरबारासाठी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. दाखल झालेल्या अर्जांचे विभागनिहाय वर्गीकरण करून त्याचे जलद गतीने निराकरण करण्यात आले. यावेळी फलटण उपविभागाच्या प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या प्रशासकीय सूचना दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी केले.
फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी उपविभागातील अधिकाऱ्यांना अर्जांच्या निराकरणाबाबत आवश्यक सूचना दिल्या. जनता दरबाराला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, तहसीलदार अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.