
श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी भाडळी येथील संगमेश्वर मंदिरात भाविकांना फळे व उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ सप्टेंबर : भाडळी खुर्द आणि भाडळी बुद्रुक या दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमेश्वर मंदिरात श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फळे आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. भाडळी बुद्रुक येथील मातोश्री संस्था समूह, जाणता राजा प्रतिष्ठान आणि नेहरू युवा मंडळ यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध उपक्रमांमुळे भाविकांचा वाढता ओघ
या संगमेश्वर मंदिरात वर्षभरात स्थानिक ग्रामस्थांचा पुढाकार आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे भाडळीसह तिरकवाडी, दुधेबावी, सासकल आणि झिरपवाडी या भागातील भाविकांचा दर्शनासाठी मोठा ओघ वाढला आहे. याच परंपरेतून यंदाही श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसाद व फळांचे वाटप करण्यात आले.
स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांचा सहभाग
या उपक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहनराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिरतोडे, माजी उपसरपंच दत्तात्रय डांगे, बाळासाहेब डांगे आणि ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील महाराज शेंडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत भारुडकार राहुल महाराज शेंडे, संपतराव डांगे, सुनील मुळीक, बाळासाहेब शेंडे, अमोल डांगे, नटराज साळवे आणि जनार्धन डांगे यांच्यासह मातोश्री संस्था समूह, जाणता राजा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.