केंद्रीय मंत्री गडकरींच्या भक्कम साथीनेच फलटणच्या विकासाला गती; रणजितदादांकडून कृतज्ञता व्यक्त!

फलटणमधील अंतर्गत पालखी मार्गावरील अत्याधुनिक स्ट्रीट लाईटचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. रस्ते विकासाची कामे वेगात सुरू आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : अनेक शहरांमध्ये पालखी महामार्ग हा शहराच्या बाहेरून (बायपास) गेला आहे, त्याचप्रमाणे फलटण शहराचा पालखी मार्ग सुद्धा शहराच्या बाहेरूनच गेला आहे. परंतु, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातून पायी चालत जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना शहरातून जाताना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण शहरातून जाणारा ‘अंतर्गत पालखी मार्ग’ विशेष बाब म्हणून मंजूर केला होता. या मार्गाचे काम आता वेगाने पूर्णत्वास जात असून, शहराचा कायापालट करण्यासाठी याच अंतर्गत पालखी मार्गावर अत्याधुनिक (हायटेक) ‘स्ट्रीट लाईट’ बसवण्यात आल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मंगलमय निमित्ताने या मनमोहक विद्युत रोषणाईचे लोकार्पण माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

नगरपालिकेच्या निवडणुकीत फलटण शहराचा कायापालट करण्याचा आणि विकासाची गंगा आणण्याचा जो शब्द दिला होता, त्याची आता खऱ्या अर्थाने पूर्तता सुरू झाली आहे. “ही तर फक्त सुरुवात आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है,” असा ठाम विश्वास रणजितदादांनी या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला.

गडकरी आणि फडणवीसांच्या पाठिंब्यामुळेच विकास शक्य

या लोकार्पण सोहळ्यादरम्यान जनतेशी संवाद साधताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की, या दोन मोठ्या नेत्यांच्या ताकदीने आणि आशीर्वादामुळेच शहराच्या विकासाचे प्रस्ताव वेगाने पुढे गेले आहेत. फलटण शहर बदलण्याचा जो शब्द या दोन महाविभूतींनी दिला होता, त्याची आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून फलटणमध्ये विणले गेले रस्त्यांचे भव्य जाळे

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीतून आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे फलटण तालुक्यात दळणवळणाची ऐतिहासिक कामे मार्गी लागली आहेत. याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे:

  • शहरांतर्गत ‘मिसिंग लिंक’ला विशेष मंजुरी: पालखी महामार्ग शहराबाहेरून जात असला तरी, रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे जिंती नाका ते नाना पाटील चौक आणि नाना पाटील चौक ते विडणी (अब्दागिरी वस्ती) असा शहरातून जाणारा ‘मिसिंग मार्ग’ थेट नितीन गडकरी यांच्याकडून विशेष बाब म्हणून मंजूर करून घेण्यात आला आहे.

  • अपघात प्रवण क्षेत्रांची मुक्ती: दरवर्षी अनेक अपघातांना निमंत्रण देणाऱ्या आणि विशेषतः पालखी सोहळ्याच्या वेळी वाहतूक कोंडी होणाऱ्या ‘रावरामोशी पुलाचे’ आता चौपदरीकरण करण्यात येत आहे. तसेच, बाणगंगा नदीवर स्मशानभूमीच्या शेजारी नवा चौपदरी पूल बांधण्यात येत असल्याने हा अपघात प्रवण भाग कायमचा सुरक्षित होणार आहे.

  • हायटेक सिमेंट काँक्रीट महामार्ग: बारामती ते फलटण आणि फलटण ते सांगली या भव्य सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे मोगराळे घाटात अत्याधुनिक ‘हायटेक टेक्नॉलॉजी’ वापरून कमीत कमी वळणांचा सुरक्षित रस्ता साकारला जात आहे.

  • तालुक्याला जोडणारे भक्कम रस्ते: फलटण ते वाठार स्टेशन फाटा (फौजी ढाबा) या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच फलटण-आसू-गिरवी आणि फलटण-पुसेगाव हे उच्च दर्जाचे रस्ते पूर्णत्वास गेल्याने फलटण शहराला आता चारी बाजूंनी ‘हायवेवरील शहर’ अशी नवी आणि प्रगत ओळख मिळाली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत फलटणकरांना दिलेला विकासाचा शब्द रणजितदादा आता पूर्ण करत असून, या मनमोहक विद्युत रोषणाईच्या आणि दर्जेदार रस्त्यांच्या रूपाने फलटणच्या प्रगतीचे हे केवळ ‘ट्रेलर’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!