
फलटण नगरपरिषदेच्या नियोजन समितीच्या बैठकीत पालखी सोहळा, सीसीटीव्ही सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि धोकादायक इमारतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : फलटण नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पालखी सोहळ्याचे नियोजन, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि जुन्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
पालखी सोहळ्यासाठी विशेष नियोजन
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था करणे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाऊचे गाडे डेक्कन चौकातील खुल्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालखीतळासह शहरातील जिंती नाका, उंब्रेश्वर चौक, श्रीराम मंदिर यांसारख्या मुख्य चौकांमध्ये सुरक्षिततेसाठी तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.
सीसीटीव्ही आणि धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता प्रमुख ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक इमारतींचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. संबंधितांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे किंवा इमारती पाडण्याबाबत नोटिसा देण्याची कार्यवाही केली जाईल.
खुल्या जागांचे संरक्षण आणि वृक्षारोपण
नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागांवर (Open Spaces) अतिक्रमण होऊ नये, तसेच तेथे कचरा टाकला जाऊ नये म्हणून अशा जागांना कंपाउंड किंवा फेन्सिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी याच खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. या बैठकीस समितीचे सदस्य, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.