फलटणमध्ये ‘आयडियल इंटरनॅशनल स्कूल’चा नयनरम्य ‘आयडियल वारी’ पालखी सोहळा

फलटणमधील आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘आयडियल वारी’ पालखी सोहळा उत्साहात पार पडला. चिमुकल्या वारकऱ्यांनी आणि रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.

स्थैर्य, फलटण, दि. १३ जुलै : फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने ‘आयडियल वारी’ पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या वारीमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि उपस्थितांची मने जिंकली.

पालखीचे पूजन आणि सन्मान

ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून या वारीला सुरुवात झाली. शाळेच्या उपक्रमांतर्गत अन्वी मोरे हिचे पालक अभय मोरे व अनिता मोरे, तसेच आरव हंबीर याचे पालक सचिन हंबीर व शितल हंबीर यांना पालखी पूजनाचा मान मिळाला. शाळेचे सचिव निखिल आणि शिक्षिका अस्मिता अडसूळ यांच्या हस्ते या पालकांचा सन्मान करून पालखीतील पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले.

चिमुकल्यांची वेशभूषा आणि दिंडी

वारीमध्ये विद्यार्थ्यांनी संतांची, विठ्ठल-रुक्मिणीची आणि वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा केली होती. ज्ञान समृद्ध करणारी ‘ग्रंथदिंडी’ आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ‘वृक्षदिंडी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वारीचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पालकांसाठी ‘क्रिएटिव्ह रील्स स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पालकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला.

बाल कीर्तन आणि प्रबोधनपर नाटक

वारी डेक्कन चौकात आल्यानंतर विविध सांस्कृतिक सादरीकरण झाले. इयत्ता सातवीतील विद्यार्थी वरुण जाधव याने बाल कीर्तनकार म्हणून प्रभावी कीर्तन केले. त्याचा सन्मान शिक्षक प्रशांत लोंढे यांनी केला. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘माणसात देव पहावा’ या विषयावर प्रबोधनपर नाटक सादर करून सामाजिक संदेश दिला.

नयनरम्य रिंगण आणि पालकांचा सहभाग

भक्तिगीतांवर आधारित रिंगण सोहळा वारीचे मुख्य आकर्षण ठरले. घोड्याची दौड आणि महिला पालकांनी धरलेला फुगड्यांचा फेर यामुळे सोहळ्याची रंगत वाढली. या सादरीकरणाचे नियोजन कोरिओग्राफर प्रशांत भोसले यांनी केले. त्यांचा सत्कार शिक्षक प्रवीण पवार यांनी केला. कल्चरल हेड स्मिता पवार यांचा सन्मान उपमुख्याध्यापिका सोफिया तांबोळी यांच्या हस्ते झाला. सादरीकरणाचे सूत्रसंचालन सेंटर हेड सुचिता जाधव यांनी केले.

परंपरेची जपणूक

संस्थापक अध्यक्षा वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांवर नैतिक संस्कार व्हावेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Back to top button
Don`t copy text!