
‘दैनिक स्थैर्य’ने लक्ष वेधल्यानंतर फलटणच्या लक्ष्मीनगरमधील सांडपाणी प्रश्न नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या तत्परतेमुळे कायमस्वरूपी सुटला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १३ जुलै : फलटण शहरातील लक्ष्मीनगर भागातील सांडपाण्याच्या समस्येबाबत ‘दैनिक स्थैर्य’ने दिलेल्या वृत्ताची नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार एकाच दिवसात नवीन पाईपलाईन टाकून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुर्गंधी व अपघाताचा धोका टळला
लक्ष्मीनगरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी गटार वारंवार चोकअप होत असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते. यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. तसेच या सांडपाण्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. ‘दैनिक स्थैर्य’ने या समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने वेगाने चक्रे फिरवली.
एकाच दिवसात पाईपलाईन बदलली
बातमी प्रसिद्ध होताच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तातडीने गटार मोकळे करण्याचे आणि त्याच दिवशी पाईपलाईन बदलण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या आदेशानुसार नगरपरिषदेच्या यंत्रणेने वेगाने काम करत एकाच दिवसात जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकली.
समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
येथील जुनी पाईपलाईन भुयारी गटार योजनेच्या मुख्य लाईनला जोडलेली असल्याने हा चोकअपचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. मात्र, आता नव्या जोडणीमुळे ही समस्या कायमची सुटली आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी नगरसेवक संदीप चोरमले यांनीही नगरपरिषदेत पाठपुरावा केला. प्रशासनाच्या या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
