कारवाई: फलटणमध्ये कृत्रिम दूध बनवणारे रॅकेट उद्ध्वस्त; पाच संशयितांवर गुन्हे

फलटण तालुक्यातील होळ येथे कृत्रिम आणि भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या रॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली असून पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १३ जुलै : फलटण तालुक्यातील होळ येथे गाईच्या दुधात पावडर आणि पाणी मिसळून कृत्रिम दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या या साखळीमुळे दूध उत्पादक आणि ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

छाप्यादरम्यान भेसळीचे साहित्य जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी रुपाली खापणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे होळ येथे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दिलीप भोसले यांच्या मालकीच्या गोठ्याजवळील खोलीत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी ‘व्हे परमीट पावडर’ (Whey Permeate Powder), ‘इन्स्टंट टी कॉफी क्रीमर’ आणि दूध घुसळण्यासाठी लागणारा मिक्सर आढळून आला. अधिकाऱ्यांनी या सर्व पदार्थांचे नमुने घेतले असून उर्वरित साठा आणि साहित्य जागेवरच जप्त केले आहे.

बारामतीतील डेअरीला कृत्रिम दुधाचा पुरवठा

चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जप्त केलेली पावडर आणि पाणी गाईच्या दुधात मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरवले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, कृत्रिम दूध बनवण्यासाठी लागणारी पावडर नीरा येथील एका व्यक्तीकडून पुरवली जात असल्याची माहितीही तपासात निष्पन्न झाली आहे. या भेसळयुक्त दूध पुरवठा साखळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय आहे.

पाच संशयितांवर कायदेशीर कारवाई

कृत्रिम दूध निर्मिती आणि पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी मंगल भोसले, दिलीप भोसले, कुणाल भोसले, नीरा येथील संशयित पुरवठादार मोरे आणि सोमनाथ डेअरीचे जबाबदार संचालक किंवा मालक यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि अन्य संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!