फलटणमधील ‘हाय व्होल्टेज’ मतदान शांततेत संपन्न; संजीवराजे की समशेरसिंह, बाजी कोण मारणार?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातील मतदान शांततेत पार पडले. अवघ्या १३० मतदारांवर या अत्यंत चुरशीच्या लढतीचा निकाल अवलंबून असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या फलटण तालुका सोसायटी मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटातील या प्रतिष्ठेच्या लढतीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.

मतदारांची घेतली विशेष खबरदारी

ही निवडणूक अवघ्या १३० मतदारांमध्ये होत असल्याने अतिशय चुरशीची बनली आहे. मतदारांची योग्य ती खबरदारी घेण्याच्या उद्देशाने दोन्ही गटांनी आपापल्या मतदारांना सुरक्षित स्थळी ठेवले होते. तेथून थेट मतदान केंद्रावर आणून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पाचारण करण्यात आले. मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मतदान प्रक्रियेवर आणि प्रत्येक मतदारावर दोन्ही गटांतील प्रमुख नेते बारकाईने लक्ष ठेवून होते.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर नशीब आजमावत आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आधी मतदान केले, त्यानंतर काही वेळाने समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे मतदान पार पडले.

निकालाची उत्सुकता शिगेला

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आतापर्यंतच्या निवडणुकीत पराभव बघितलेला नाही. दुसरीकडे, मागील विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर फलटण तालुका परिवर्तनाच्या दिशेने गेल्याचे मानले जाते. या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आणि दोन्ही गटांच्या विजयाच्या दाव्यांमुळे, आता जिल्हा बँकेच्या या अटीतटीच्या लढतीचा अंतिम निकाल काय लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!