
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँकेच्या फलटण सोसायटी मतदारसंघासाठी समशेरसिंह विरुद्ध संजीवराजे निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. अवघ्या 131 मतदारांवर निकाल अवलंबून असून, या महत्त्वपूर्ण निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०१ नोव्हेंबर : सातारा जिल्हा बँकेच्या फलटण सोसायटी मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात मोठी लढत होत असून, येथील नगर परिषदेच्या आठ नंबर शाळेत मतदान सुरू आहे.
131 मतदारांवर मदार
दोन्ही गटांकडून मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. फलटण सोसायटी मतदारसंघामध्ये अवघे 131 मतदार असून, काळजी म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आता त्यांना थेट मतदान केंद्रावर आणले जात आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते मतदानावर लक्ष ठेवून आहेत.
भाजपची जोरदार मोर्चेबांधणी
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेत यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सूक्ष्म नियोजन करत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
‘राजे’ गटासाठी अस्तित्वाची लढाई
विधानसभा, नगरपरिषद, पंचायत समिती अश्या निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्यामुळे ही निवडणूक ‘राजे’ गटासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नव्या नियमांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ते यापूर्वीच जिल्हा बँकेच्या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे या 131 मतदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदानानंतर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, त्यानंतरच फलटणमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.





