
फलटण ग्रामीण पोलिसांनी मांडवखडक हद्दीत लुटमारीच्या तयारीत असलेल्या टोळीचा उसाच्या शेतात पाठलाग करून दोघांना अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : फलटण ग्रामीण पोलिसांनी मांडवखडक हद्दीत हॉटेल बाणगंगा जवळ येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी उसाच्या शेतात आणि कुरवली तलावाजवळ तब्बल २ किलोमीटर पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटमारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
उसाच्या शेतात २ किलोमीटर थरारक पाठलाग
मांडवखडक गावच्या हद्दीत काही संशयित लुटमारीच्या उद्देशाने थांबल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच पाच जणांनी पळ काढला. पोलिसांनी तत्परता दाखवत उसाच्या शेतातून व तलावाच्या बाजूने २ किलोमीटर पाठलाग करत राहुल नाना घुले (रा. इंदिरानगर, मलठण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी) या दोघांना शिताफीने पकडले, तर तीन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयितांकडून चोरी आणि लुटमारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार तीन संशयितांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील अनेक चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, दीपक पवार, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस आणि तुषार नलवडे यांच्या पथकाने केली.
