अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश; धोकादायक पर्यटनस्थळांवर प्रवेशाला बंदी

स्थैर्य, सातारा, दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ आणि ‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई व सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील प्रमुख मुद्दे:

  • पर्यटनस्थळांवर निर्बंध: जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अपघातप्रवण ठिकाणी ‘प्रवेश निषिद्ध’ आणि ‘धोकादायक क्षेत्र’ असे फलक लावून गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • तातडीचे स्थलांतर: दरडप्रवण, अतिधोकादायक भाग आणि मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी (शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे) स्थलांतरित करावे. त्यांच्यासाठी निवास, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

  • घाटरस्त्यांवरील प्रवास आणि वाहतूक: अतिवृष्टीच्या काळात घाटरस्त्यांवरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओढे, नाले व नद्यांना पूर आल्यास किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग वाहतुकीसाठी तात्काळ बंद करून तिथे बॅरिकेडिंग आणि पोलीस/होमगार्ड तैनात करावेत.

  • प्रशासकीय सज्जता: सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा व पंचायत समित्यांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहतील. तसेच सर्व तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना आपापल्या मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

  • नागरिकांना सूचना: हवामानाचा अंदाज, धरणातील पाण्याचा विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळी याबाबतची माहिती सोशल मीडिया, दवंडी आणि स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी.

कडक कारवाईचा इशारा: प्रशासनाने दिलेल्या या आदेशांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५’ मधील तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे.

Back to top button
Don`t copy text!