
थेट WhatsApp वर मिळवा
शरयू साखर कारखाना कापशी येथे २०२६-२७ गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला असून यंदा प्रतिदीन ११ हजार टन गाळपाचे नियोजन केले आहे.
स्थैर्य, कापशी, दि. १६ सप्टेंबर : शरयू साखर कारखाना येथे आगामी २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बारावा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. आगामी हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली असून प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वाढीव गाळप क्षमतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
आगामी गाळप हंगामासाठी कारखान्याची क्षमता वाढवल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. उपलब्ध ऊस वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने गाळप होण्यासाठी प्रशासनाने सर्व तांत्रिक तयारी, यंत्रसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन पूर्ण केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक अविनाश भापकर व कमल भापकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यास प्राधान्य
ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा मुख्य केंद्रबिंदू असून त्यांचा ऊस सुरळीतपणे गाळप करण्यासाठी व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यास युनिट हेड सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.