दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुती अध्यक्ष, तलाठी, कोतवाल, पत्रकार बांधव, राशन दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉटर, शिक्षक, सोसायटी चेअरमन तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार, दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता अक्षत मंगल कार्यालय, तावडी, ता. फलटण येथे ही बैठक होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील गुन्ह्यांना आळा घालण्याकरीता सर्व गावांमध्ये प्रभावीरित्या ग्राम सुरक्षा यंत्रणा (हेल्पलाईन फोन १८००२७०३६००) कार्यान्वित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडा, आग, जळीताच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्यप्राणी हल्ला, पूर, भूकंप इ. घटनांमध्ये सर्व गावाला एकाचवेळी सूचना देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेची उपयोगिता वेळोवेळी सिध्द होत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास ग्राम सुरक्षा वापरामुळे मोठी मदत होत आहे. त्यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीरित्या कार्यान्वित करण्याकामी पोलीस स्टेशन निहाय बैठकीचे आयोजन केले आहे.