फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण तहसील कार्यालयात आज फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जमीन अधिग्रहणातील समस्या सोडवून फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश खा. रणजितसिंह यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले आहेत. लवकरच फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी ७०० कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया सुरू होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी फलटणचे प्रांताधिकारी श्री. शिवाजीराव जगताप, बारामती तालुक्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, रेल्वे विभागाचे अधिकारी श्री. अजय महाराव, श्री. सचिन मुंगसे, श्री. योगेंद्र सिंह, श्री. सागर चौधरी व तहसीलदार समीर यादव तसेच भाजपचे पदाधिकारी व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी खासदार रणजितसिंह यांनी सांगितले की, आज मला सांगताना आनंद होत आहे की, येत्या १५ ते २० दिवसांतच फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी सुमारे ७०० कोटींची टेंडर प्रक्रिया निघणार आहेत. पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली आहे की, ९० टक्के पेक्षा जास्त जमीन अधिग्रहण असल्याशिवाय रेल्वेचे काम सुरू होत नाही, परंतु या रेल्वे मार्गाला गती देण्याच्या द़ृष्टीकोनातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांचे या प्रकल्पात विशेष लक्ष असल्याने त्यांनी ७० टक्के जमीन अधिग्रहणावरच या रेल्वे मार्गाच्या कामासाठी विशेष परवानगी देण्याच्या सूचना मध्य रेल्वेला दिल्या आहेत. या रेल्वेमार्गाचे ७० टक्के अधिग्रहण झालेले आहे, राहिलेल्या अधिग्रहणात शासनाकडूनच आपल्याला जमीन येणे असल्याने हे राहिलेले अधिग्रहण दोन महिन्यातच १०० टक्के जमीन अधिग्रहण होईल. येणारा पावसाळा संपला की रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल. २३ वर्षांपासून अर्धवट राहिलेला हा प्रकल्प लवकरच मार्गी लागून फलटणकर नागरिक आता बारामतीहून दिल्लीला रेल्वेने जाणार आहे. या परिसरातील नागरिकांना दिल्लीला जाण्यासाठी पुण्याकडे जावे लागत होते. आता त्यांचे ६० ते ७० किलोमीटरचे अंतर वाचून बारामतीहून दिल्लीला जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या रेल्वे मार्गाबरोबरच आता फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गालाही आता मंजुरी मिळालेली आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ९०० कोटींचा निधी दिला आहे, तर केंद्र शासनाने २० कोटी रुपयांचे टोकण दिलेले आहे. येत्या चार-पाच महिन्यांमध्ये फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहणाचे टेंडर निघतील. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गांसाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या जमिनींचा भाव मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. येत्या दोन वर्षात फलटण-पंढरपूर रेल्वेही आपल्याला धावताना दिसेल. माढा मतदारसंघातील मार्गावरून रेल्वे आता दक्षिणेत विजापूर, चेन्नई, तेलंगणा राज्याकडे तसेच उत्तरेत दिल्लीपर्यंत जातील, असा आपल्याला विश्वास आहे. फलटण – पंढरपूर रेल्वे ही केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांना दिलेली भेट असणार आहे. फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गांसाठी केंद्र शासनाने ज्या गतीने मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यांची आर्थिक समृद्धी होणार आहे. यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

यावेळी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, फलटण-लोणंद-बारामती रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे ७० टक्के काम झालेले आहे. ३० टक्के जे जमीन अधिग्रहण बाकी आहे, ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे. येत्या दोन महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या काही जागेच्या अडचणी होत्या, त्या जवळपास दूर झालेल्या आहेत. ही रेल्वे फलटणहून निघून बारामती शहराला वळसा घालून तेथे रेल्वेच्या होणार्‍या नवीन बारामती स्टेशनला थांबणार आहे.
यावेळी प्रांताधिकार्‍यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहणाचे ७० टक्के काम खाजगी वाटाघाटीने घेतलेले आहे. उर्वरित काम कायद्यान्वये शेवटच्या टप्प्यात आलेले आहे.

बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, फलटण-लोणंद-बारामती रेल्वे मार्गासाठी फलटण व लोणंदमधील शेतकर्‍यांनी काहीही अडचणी न आता सहकार्याच्या भूमिकेतून आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यावेळी नागरिकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.


Back to top button
Don`t copy text!