फलटणमध्ये रिक्षाचालक आक्रमक; १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

फलटणमध्ये रिक्षा पासिंग व इतर मागण्यांसाठी रिक्षा संघटनेने आरटीओ प्रशासनाला निवेदन देऊन १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ सप्टेंबर : फलटण शहरातील रिक्षाचालकांच्या प्रलंबित समस्या आणि विविध मागण्यांसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांना निवेदन देण्यात आले. फलटण येथे नियमित पासिंग सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

पासिंग आणि एलपीजी टेस्टिंग सुविधेची मागणी

फलटण आरटीओ कार्यालयात दररोज किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ऑटो रिक्षा व मीटर पासिंगची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय एलपीजी हायड्रोलिक टाकी टेस्टिंगची सुविधा सातारा जिल्ह्यात सुरू करण्याची आणि स्थानिक पायाभूत सुविधा निर्माण करेपर्यंत दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

यावेळी सचिन विधाते यांनी फलटणमधील सर्व रिक्षा मालकांची माहिती एकत्र करण्याच्या सूचना दिल्या. ही माहिती मिळताच सातारच्या कार्यालयातून डेटा ट्रान्सफर करून फलटणमध्येच पासिंग सुविधा सुरू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम, माजी अध्यक्ष दादा अहिवळे, राजेंद्र काकडे आणि संजय मोरे उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!