
एसटीच्या एनसीएमसी कार्ड सक्तीवरून मंत्री आशिष शेलार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात मतभेद समोर आले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ सप्टेंबर : एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनिवार्य केलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’च्या (एनसीएमसी) सक्तीला भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून आता महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
प्रताप सरनाईक यांचा शेलारांवर पलटवार
आशिष शेलार यांच्या या भूमिकेवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आतापर्यंत सुमारे ९.१ कोटी प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून हे कार्ड लागू करणे आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच शेलार यांनी थेट अधिकाऱ्यांशी बोलण्याऐवजी परिवहन मंत्री म्हणून आधी माझ्याशी चर्चा करायला हवी होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
महायुतीत राजकीय कुरघोडीचे चित्र
गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आशिष शेलार यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सक्ती स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरनाईक यांनी वित्त विभागाच्या अनुदानातील अडचणींचे कारण देत या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात प्रशासकीय निर्णयांवरून दोन्ही पक्षांतील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.