
स्थैर्य, दि.१६: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. बोर्डाने आता स्थानिक टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या 240 खेळाडूंसह अधिकाऱ्यांना कोरोना चाचणीचे पैसे मागितले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाकडे कोरोना चाचणीसाठी लॅब आणि हॉस्पिटलची सुविधादेखील नाही.
पाकिस्तानमध्ये 30 सप्टेंबरपासून रावळपिंडी आणि मुल्तानमध्ये नॅशनल टी-20 चॅम्पियनशिप सुरू होणार आहेत. यापूर्वी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना दोन कोरोना चाचण्या करणे अनिवार्य आहे. पीसीबीने स्पष्ट केले की, एका चाचणीसाठी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, तर दुसरी टेस्ट बोर्डाकडून होईल.
पीसीबीला स्पॉन्सर मिळाला नाही
कोरोना महामारीमुळे पाकिस्तानातील सर्व क्रिकेट सीरीज रद्द झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात होणारा आशिया कपही रद्द करण्यात आला. इतकच काय,तर पाकिस्तानला जुलैमध्ये इंग्लँड दौऱ्यासाठी स्पॉन्सरदेखील मिळत नव्हता. अखेर पेप्सी आणि मोबाइल कंपनी ‘ईजी पैसा’ने कॉन्ट्रॅक्ट वाढवला.
पीसीबीने कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरुन काढून टाकले
आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे पीसीबीने नुकतेच आपल्या 5 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. बोर्डात सध्या अंदाजे 800 लोक काम करतात. सर्वांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पीसीबीने गरजेचे नसलेल्या आणि खराब परफॉर्मेंस असलेल्या कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी दर्शवली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या 2-3 वर्षात बोर्ड बंद पडू शकते.