तळागाळातील लोकांच्या नवोन्मेषाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन आणि स्कू न्यूज यांची भागीदारी


 

स्थैर्य, सातारा, दि.८: तळागाळातील लोकांच्या यशोगाथा, नवोन्मेष सामायिक करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग हे भारतातील सर्वात मोठ्या शिक्षण माध्यमांपैकी एक असलेल्या स्कू न्यूज सोबत सहयोग करीत आहे.

या सहयोगातून अटल इनोव्हेशन मिशन आणि अटल टिंकरिंग लॅबच्या विविध उपक्रमांबद्दल केवळ शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांमध्येच अधिक जागरूकता निर्माण होणार नाही तर शाळा, विद्याशाखा, शिक्षक आणि समुपदेशक यांनाही जगभरातील दर्जेदार दृष्टीकोन, सामग्री आणि उत्तम पद्धती प्रदान केल्या जातील.

अटल इनोव्हेशन मिशनने आपल्या नेटवर्कद्वारे सुरू केलेल्या विविध कार्यक्रम किंवा स्पर्धांना स्कू न्यूज सहकार्य देईल. पुढे, देशभरातील प्रेरणादायक कथांचा दस्तावेज बनवून तो सामायिक करण्याचे ध्येय ठेवून अटल इनोव्हेशन मिशन आणि स्कू न्यूज अटल टिंकरिंग लॅबशी संबंधित सामग्री, तळागाळातील लोकांच्या यशोगाथा आणि नवोन्मेष, तांत्रिक शिक्षणाशी संबंधित बातम्या तसेच अटल इनोव्हेशन मिशनद्वारा समर्थित विविध स्टार्टअप्स आणि संस्थांच्या कथा मासिक तत्वावर संकलित करून प्रकाशित करतील. अटल टिंकरिंग लॅब मॅरेथॉनच्या सर्वोत्तम नवोन्मेषांच्या प्रशंसेसाठी स्कू न्यूज एक खास प्रकाशनही आणेल.

देशात दहा लाख नवउद्योजक आणि संभाव्य रोजगारदाते तयार करणे हे अटल इनोव्हेशन मिशनचे उद्दीष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी प्रेरणादायक लोकांच्या कथा सामायिक करणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत आमचे अटल टिंकरिंग लॅबचे लाभार्थी सर्व अडचणींचा सामना करीत आहेत. त्यांच्या यशोगाथा सामायिक करून त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. अशा यशोगाथांची माहिती मिळवून त्या सामायिक करण्यासाठी स्कू न्यूज बरोबरची आमची भागीदारी महत्वपूर्ण ठरणार आहे असे अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर. रामानन यांनी सांगितले. 

कोविड -19 काळातही शालेय शिक्षणात सकारात्मक कथा आणण्यासाठी अथक परिश्रम केल्याबद्दल त्यांनी स्कू न्यूज चमूचे आभार मानले.

“अटल इनोव्हेशन मिशन बरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही देशभरातील प्रेरणादायी यशोगाथा शोधून त्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा, समुपदेशक आणि इतर हितधारकांच्या माध्यमातून दर्जेदार सामग्री तयार करण्यास वचनबद्ध आहोत. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन बरोबर मजबूत भागीदारी केल्याने आपण भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेतील सर्वोत्तम कामगिरी करू शकू आणि आपल्या संस्थेची ध्येयधोरणे आणि दृष्टिकोन वाढवू शकू.” असे स्कू न्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी संटलानी म्हणाले.

अटल इनोव्हेशन मिशनमध्ये आमचा असा विश्वास आहे की भारतीय संस्था, संघटना आणि कंपन्यांसह असे कोणतेही सहकार्य सार्वजनिक-खाजगी भागीदारी विकसित करण्यासाठी आणि युवा विद्यार्थ्यांचे प्रेरक साधन म्हणून संशोधनाला वाव देण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!