पालकांनो विश्‍वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा


 

स्थैर्य, सातारा, दि.२ : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थी सुरक्षेबाबत शासन व शाळा सज्ज असतानाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी-शिक्षकांची थर्मलद्वारे तपासणी, मास्क बंधनकारक व सुरक्षित अंतर ठेवणे या सूत्रांचा वापर केला. कोरोनाची भीती आहे. परंतु, योग्य खबरदारी घेतल्यास सुरक्षित राहता येते, ही मानसिक तयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत दक्षता घेऊन शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यापासून कोरोना नियंत्रित आल्याने नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. त्यानुसार सर्व शाळांत विद्यार्थी व शिक्षक बैठक व्यवस्था, विविध कार्यगट गठीत करणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी शालेय परिसरात विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे, पालकांची संमतीपत्रे घेणे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. 

सध्या जिल्ह्यातील एकूण 820 शाळांपैकी 726 शाळा सुरू आहेत. उर्वरित शाळाही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. शाळा बंद असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्‍य नसल्याचे निदर्शनास आले. तसेच महत्त्वाच्या विषयांसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) अध्यापनाची आवश्‍यकता असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे द्यावीत 

जिल्ह्यातील शाळांमधील सरासरी 40 टक्के पालकांनीच विद्यार्थी शाळेत पाठविण्यास संमतीपत्रे दिली आहेत. परंतु, अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे शाळा प्रशासनाला द्यावीत. पालकांनीही शाळा प्रशासनावर विश्‍वास ठेऊन पाल्यांना शाळेमध्ये पाठवावे. विद्यार्थी व शिक्षक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाचे धडे नक्कीच गिरवतील, असाही विश्‍वास श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!