विद्यार्थिनी कोरोनाबाधित झाल्याने ग्रामस्थांनी शाळाच ठेवल्या बंद


 

स्थैर्य, दहिवडी (जि. सातारा), दि.२ : लॉकडाउननंतर 23 नोव्हेंबर रोजी
शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे.
विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने देवापूरची शाळा बंद करण्यात आली आहे.
तर एकूण नऊ शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन उमदे प्राथमिक शिक्षक
कोरोनाचे बळी ठरल्याने शैक्षणिक क्षेत्रावर भीतीचे सावट आहे.

मागील काही दिवसांत माण तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मुळातच प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती. त्यातच कोरोनाच्या भीतीने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ लागली. कोरोनाची काळजी घेताना शाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होत नाही. शाळेत येणाऱ्या सर्व सेवकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र शाळा प्रशासनाला सादर केले आहे. मात्र, यापुढे कोणीच कोरोनाबाधित होणार नाही याची खात्री कोण देणार, हा प्रश्न आहे. शाळेत येणारे शिक्षक व विद्यार्थी अनेक ठिकाणांहून येतात त्यामुळे चिंतेत भर पडतच आहे. संमतीपत्र देऊनही अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत. जेवढे विद्यार्थी ऑनलाइन हजर राहत होते, त्याच्या निम्मेसुद्धा विद्यार्थी शाळेत येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. 

एक हजार 869 पर्यंत उपस्थिती खाली 

माण तालुक्‍यातील एकूण 72 पैकी 67 शाळा 23 नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या. त्यामध्ये एकूण 11 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी दोन हजार 240 विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. त्यानंतर काही गावांत कोरोनाबाधित सापडल्यामुळे चार शाळा बंद करण्यात आल्या. विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस घटून ती एक हजार 869 पर्यंत खाली आली. देवापूर शाळेत विद्यार्थिनीच कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. तर जांभुळणी, वरकुटे मलवडी, पानवण, वडजल, राणंद, मेरीमाता स्कूल म्हसवड व पिंगळी बुद्रुक, गोंदवले खुर्द व धुळदेव येथील शाळा गावांत कोरोनाबाधित सापडल्यामुळे ग्रामस्थांनीच सुरू केलेल्या नाहीत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!