

स्थैर्य, फलटण, दि. २ जून : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा आणि फलटण येथील सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. डॉक्टर बी. आर. आंबेडकर आयआयटी संस्थेमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात ५१ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली असून या उपक्रमाला युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोजगार मेळावा पार पडला. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य मनोज कुमार दळवी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
या रोजगार मेळाव्यात उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कमिन्स इंडिया लिमिटेड, भारत बेंज, जॅक्सन लिमिटेड फलटण, रिप्लेस इंजेक्टर प्रायव्हेट लिमिटेड खंडाळा आणि साई सप्लायर्स फलटण या कंपन्यांचा समावेश होता. एकूण पाच उद्योजकांनी सहभाग नोंदवत विविध कंपन्यांतील ९४ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली.
रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी या मेळाव्यास एकूण १७४ उमेदवार उपस्थित होते. यामध्ये ५७ महिला उमेदवार आणि ११७ पुरुष उमेदवारांचा सहभाग होता. स्थानिक तरुणांनी या संधीचा चांगला लाभ घेतला.
भरती प्रक्रियेदरम्यान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून एकूण १७८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून ६९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील प्रक्रियेअंती ५१ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या रोजगार मेळाव्यामुळे स्थानिक युवक-युवतींना त्यांच्याच परिसरात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरीची संधी मिळाल्याने निवड झालेल्या उमेदवारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.