दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । सातारा । महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर, मरळी ता. पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 एप्रिल ते 23 एप्रिल 2023 असे चार दिवस कार्यकम होणार आहेत.
दौलतनगर, मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या आयोजना विषयी बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञारेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, प्रांताधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरुवात शासनाच्या विविध विभागांकडील योजनांच्या चित्ररथाने होणार आहे. यामध्ये 24 विभागांकडील 26 चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासोहब देसाई यांनी केलेल्या कार्याची व त्यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे दर्शन घडविणारे चित्ररथही सहभागी होणार आहे. मरळी येथून सुरु होणारी चित्ररथांची दिंडी पाटण येथे विसर्जित करण्यात येणार आहे.
या बरोबरच आरोग्य तपासणी शिबीर, शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच विविध प्रवचने व किर्तन, भजन, जागर यांचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीरामध्ये उपस्थितांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.