दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । सातारा । पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज दौलतनगर-मरळी येथे निवडक लाभार्थींना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वाटप करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात एकूण ३ लाख ८७ हजार ४४१ ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त झाले आहेत. या संचामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वाटप सुरू झाले असून उद्यापर्यंत बहुतांश शिधा वाटप पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यासाठी 45 हजार 500 आनंदाचा शिधा संच प्राप्त झाले आहेत. त्यांचे शासकिय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते दौलत नगर आणि मरळी येथील रास्त भाव दुकानातील लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई यांनी हा लाभ तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे व संबंधित अधिकारी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.