दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । पुणे । पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डीजीमधील न्हावरा ते चौफुला रस्त्याचे उन्नतीकरण व मजबुतीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार ॲड. राहुल कुल, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, न्हावरा ग्रामपंचायतीचे सदस्य अलका शेंडगे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार १०९ कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामध्ये आळंदी ते पंढरपूर दरम्यान संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ७ हजार २९३ कोटी, देहू ते पंढरपूर दरम्यान संत तुकाराम पालखी मार्ग ४ हजार ४१५ कोटी, चांदणी चौक उड्डाणपूल ४०० कोटी, नाशिक फाटा ते राजगुरूनगर उड्डाणपूल ८ हजार कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर दुमजली उड्डाणपूल ११ हजार कोटी, पुणे-शिरुर दुमजली उड्डाणपूल १३ हजार ५०० कोटी, शिंदेवाडी-वरंधाघाट ७२३ कोटी, उंडवडी-बारामती-फलटण ५७८ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
या रस्त्याची कामे पूर्ण झाल्यावर रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल लवकरात लवकर बाजारपेठेत पोहचण्यास मदत होणार आहे. रस्त्याची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.कामे नियोजनानुसार पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी न्हावरा येथील मल्लिकार्जुन देवस्थान परिसर विकासासाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिकेत पुस्तक खरेदी करणे, हनुमान मंदीर जीर्णोद्धार, उपजिल्हा रुग्णालय, उप जिल्हा सह निबंधक कार्यालय, पोलीस स्थानक, तालुका कृषि मंडळ मंजूर करणे आदी मागणीनिहाय प्रस्ताव सादर करण्याचा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.
आमदार ॲड. कुल म्हणाले, न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हद्दीवाढच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्याची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कार्यवाही सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
न्हावरा ते चौफुला रस्ता
या रस्त्याच्या कामावर सुमारे २५० कोटी ८९ लाख रुपये खर्च होणार आहे. रस्त्याची लांबी २४ कि.मी. असून पुढील दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा रस्ता चाकण, शिक्रापूर, न्हावरा, आढळगाव, जामखेड, अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी वर न्हावरा येथे सुरु होऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील चौफुला येथे संपणार आहे.
न्हावरा ते चौफुला रस्ता रस्ता चाकण, शिक्रापूर, शिरुर, सुपा, कुरकुंभ आदी महत्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडण्यास उपयुक्त ठरतो व त्यामुळे औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे. वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी निकालात निघणार आहे. रहदारीच्या रस्त्यावरुन कमी वेळात प्रवास करणे शक्य होणार आहे. इंधनाची बचत, सुरक्षित वाहतूक करणे, यामुळे शक्य होणार आहे.