
दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२२ । फलटण । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या मागणीनुसार मनमाड – मिरज या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येणार्या बारामती – फलटण या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. विरोधकांनी याबाबत श्रेयवाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करु नये, असा इशारा राजे गटाचे युवा कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, उंडवडी कडे पठार – बारामती – फलटण या 36 कि. मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 160 चे चौपदरीकरण व खडीकरण, डांबरीकरण कामास केंद्र शासनांतर्गत रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि. 21 मार्च रोजी मंजूरी दिली असून त्यासाठी 778.18 कोटी रुपये मंजूर झाल्याच्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे कुणी पाठपुरावा केला होता हे स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडूनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्रेयवाद करण्याचा प्रयत्न होत आहे. हे अत्यंत चुकीचे असून त्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. अशा प्रकारातून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास अजिबात ढळणार नाही; हेही त्यांनी लक्षात ठेवावे, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.