दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खेळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन राखले जाते. अपयश पचवण्याची शिकवण मिळते. खेळ हे जीवनशैलीतील महत्त्वाचे घटक आहेत. या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संयम, खिलाडूपणा दाखवण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभागातर्फे आयोजित पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. एम. देशमुख होते.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. तायाप्पा शेंडगे, डॉ. टी. पी. शिंदे, स्टाफ सेक्रेटरी प्र. शंभू निंबाळकर, एनसीसी विभागप्रमुख धुमाळ सर, शिंदे सर, पंच गंगतीरे, पत्रकार मुगुटराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य कदम म्हणाले की, सदरचा उपक्रम फक्त मुधोजी महाविद्यालयातच गेले तीन वर्ष राबवला जात आहे. महाविद्यालयाचे क्रीडांगण अतिशय वैभवसंपन्न असून महाविद्यालय सर्वच स्पर्धांमध्ये भाग घेत असते. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. अशा आंतरकुल स्पर्धांमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळते. खरंतर आयुष्यामध्ये खेळ हा मानवाचा अविभाज्य घटक आहे. सध्या करिअरच्या दृष्टिकोनातून खेळातून विद्यार्थ्यांना पाच टक्के नोकरीमध्ये रिझर्वेशन असल्याने त्याचाही फायदा होतो. खेळामुळे माणूस सशक्त बनतो, उत्साही बनतो. या दोन दिवसांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निखळ आनंद लुटावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये समारंभाचे अध्यक्ष उपप्राचार्य डी. एम. देशमुख यांनी फलटण तालुक्यातील कुस्तीगिरांची माहिती देऊन फलटण ही खेळाची पंढरी आहे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे खोखो असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून फलटणमध्ये क्रीडा विभागाला अतिशय उज्ज्वल अशा संधी मिळत आहेत, असे सांगितले.
प्राध्यापक दिलीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व प्रदर्शनीय सामन्याचे निवेदनही केले. नीलम देशमुख यांनी आभार मानले. यावेळी मुलींचा खो-खोचा सामना झाला, त्यामध्ये बारावी सायन्सच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली.