दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या दिव्यांगांच्या योजना तसेच वयोश्री योजना फलटण तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणार्या दिव्यांगांच्या योजना तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना यामार्फत दिव्यांगांना तसेच वयोवृद्धांना मिळणार्या साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम फलटण येथे आयोजित केला होता. त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार मोहिते-पाटील म्हणाले की, यापूर्वी केंद्र शासनामार्फत किंवा राज्य शासनामार्फत राबविल्या जाणार्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नव्हत्या. आता त्या कार्यक्षम अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या जागरुकतेमुळे पोहोचू लागल्या आहेत. फलटणमध्ये आज दिव्यांग बांधव व वयोवृध्दांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच आमदार दीपक चव्हाण यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच फलटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्यामुळे या योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. अजूनही ज्या लाभार्थ्यांना या योजनांचा फायदा मिळालेला नाही, त्यांच्या कुटुंबियांनी यामध्ये लक्ष घालून आपल्या घरातील दिव्यांग किंवा वयोवृध्दांना याचा फायदा मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार मोहिते-पाटील यांनी यावेळी केले. यापुढेही अशा योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील, असेही मोहिते-पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, केंद्र शासनाच्या दिव्यांगांच्या योजना तसेच नुकतीच राज्य शासनाने सुरू केलेली वयोश्री योजना यांचा लाभ फलटणमधील सर्व वयोवृध्दांना मिळण्यासाठी माझे कायम सहकार्य मिळणार आहे. वयोवृद्धांच्या मार्गदर्शनानेच घराचा तसेच समाजाचा विकास होत असतो, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. वयोश्री योजनेसाठी फलटण तालुक्याला ३५ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे राहिलेल्या लाभार्थींच्या कुटुंबियांनी, तरुणांनी तसेच कार्यकर्त्यांनी व अधिकार्यांनी यामध्ये लक्ष घालून सर्वांना याचा लाभ मिळवून द्यावा.
या कार्यक्रमात शेकडो दिव्यांग बांधव तसेच वयोवृद्धांना साहित्याचे वाटप करण्यात आले.