पालिकेत वाद टाळून एकत्र राहा; खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरसेवकांना सक्त सूचना


सातारा पालिकेतील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी पालिकेचे कामकाज एकजुटीने करण्याच्या, हेवेदावे टाळण्याच्या आणि आगामी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

 स्थैर्य, सातारा, दि. २५ : सातारा पालिकेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात झालेल्या वादाची दखल घेत रविवारी साताऱ्यात एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईतील भेटीनंतर ही बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन्ही राजेंसह नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील, अविनाश कदम आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि राजेंच्या सूचना:

  • एकजूट आणि समन्वय: आता ‘सातारा विकास आघाडी’ आणि ‘नगर विकास आघाडी’ असा भेद राहिला नसून सर्वांनी एकाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पालिकेत गटबाजी आणि वाद टाळून सर्वांनी एकत्र राहावे.

  • सभेपूर्वी चर्चा: सर्वसाधारण सभेपूर्वी स्वतंत्र बैठक घेऊन विषयांवर चर्चा करावी. चर्चा करूनही मार्ग न निघाल्यास थेट आमच्याशी (नेत्यांशी) बोलावे. तसेच, सभागृहातील वादग्रस्त विषय शक्यतो तहकूब करावेत.

  • नव्या नगरसेवकांना सोबत घ्या: जुन्या नगरसेवकांनी नव्या नगरसेवकांना कामकाजात सामावून घ्यावे आणि त्यांचा गटबाजीसाठी अजिबात वापर करू नये. प्रशासनानेही नव्या नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य द्यावे.

  • स्वच्छता कामगारांचे शोषण थांबवा: सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा पूर्ण मोबदला मिळायला हवा. पालिकेकडून वेगळी रक्कम घेऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना कमी वेतन देण्याचे आर्थिक शोषणाचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत, अशी सक्त ताकीद शिवेंद्रसिंहराजेंनी दिली.

विधानपरिषद निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्देश:

सांगली-सातारा विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राजेंनी नगरसेवकांना स्पष्ट शब्दांत बजावले की, कोणाच्याही उमेदवारी अर्जावर आमच्याशी बोलल्याशिवाय सह्या करू नका. तसेच, या जागेसाठी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य धैर्यशील कदम यांची नावे सुचवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दोन्ही राजेंनी केलेल्या इतर विशेष सूचना:

  • शहरात प्रभागनिहाय छोटे ‘हॉकर्स झोन’ तयार करा.

  • वाढत्या अतिक्रमणांवर ठोस निर्णय घ्या.

  • गोडोली येथील १३ एकर जागेवर क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव तयार करा.

  • कामकाजात सुसूत्रता आणा आणि वैयक्तिक हेवेदावे टाळा.


Back to top button
Don`t copy text!