नागरिकांना मोठा दिलासा; घरखरेदी आणि विवाह नोंदणीचे ऑनलाइन अर्ज होणार अधिक सुटसुटीत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

घरखरेदी, गहाणखत आणि विवाह नोंदणीसाठी ऑनलाइन अर्जातील रकाने व कागदपत्रांची संख्या निम्म्याहून कमी करण्यात आली असून, प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधीही घटवण्यात आला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २० नोव्हेंबर : घराची खरेदी-विक्री, बँक कर्जासाठी गहाणखत नोंदणी आणि विवाह प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना नागरिकांना होणारा मनस्ताप आता दूर होणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने १५ ऑनलाइन सेवांचे १० सेवांमध्ये एकत्रीकरण करत अर्जांमधील रकान्यांची आणि कागदपत्रांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे. या निर्णयामुळे प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधीही निम्म्याहून कमी झाला असून सर्वसामान्यांचे सरकारी कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.

अर्जातील रकाने निम्म्याहून कमी

नवीन सुधारणेनुसार, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणी अर्जातील १०१ रकाने कमी करून आता ४७ करण्यात आले आहेत. तसेच बँक कर्जासाठी गहाणखताची सूचना नोंदवण्याच्या अर्जातील रकाने ९८ वरून ४१, तर मुद्रांक शुल्क मूल्यांकन अहवालाच्या अर्जातील रकाने ४५ वरून २० वर आणण्यात आले आहेत. याशिवाय विवाह नोंदणीच्या अर्जातील ५५ ते ६६ रकान्यांऐवजी आता केवळ ३१ ते ४१ रकाने भरावे लागणार आहेत.

केवळ तीन दिवसांत मिळणार विवाह प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी लागणारी १५ दिवसांची मुदत आता केवळ तीन दिवसांवर आणण्यात आली आहे. नोंदणीकृत दस्ताची प्रमाणित प्रत आणि ‘इंडेक्स-२’ देखील एकत्रितरीत्या तीन दिवसांत उपलब्ध होणार असून, मुद्रांक शुल्क मूल्यनिर्धारणाचा कालावधी ४५ दिवसांवरून ३० दिवसांवर आला आहे. दस्त नोंदणी न झाल्यास शुल्क परताव्यासाठी लागणाऱ्या १४ कागदपत्रांऐवजी आता केवळ पाच ते सहा कागदपत्रे पुरेशी ठरणार असून, प्रतिज्ञापत्राऐवजी स्वघोषणापत्र स्वीकारले जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!