
थेट WhatsApp वर मिळवा
स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या दुर्धर आजारावर मोफत उपचार मिळण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी(एसएमए) यांसारख्या मणक्याशी संबंधित दुर्धर आणि अत्यंत खर्चिक आजारांनी ग्रस्त रुग्णांना महागड्या उपचारांअभावी आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसएमए आजाराचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत तातडीने समावेश करण्याची कार्यवाही करावी आणि रुग्णांना वेळेत निदान व औषधे मिळावीत यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिं दे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. विधानभवनात दुर्धर आजारांच्या उपचार व्यवस्थेबाबत आयोजित बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
निदान आणि औषध पुरवठ्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती
एसएमए हा गंभीर आजार असून त्यावरील उपचार सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रुग्णांची नोंदणी, लवकर निदान आणि तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांचा नियमित पुरवठा सुलभ व्हावा, यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्यासह केईएम व वाडिया रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न
सध्या केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयाची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड केली असून, तेथे दुर्धर आजारांचे निदान आणि उपचार केले जातात. यासोबतच मुंबईतील वाडिया बालरुग्णालयातही एसएमए आजारावरील उपचारांची उत्तम सुविधा उपलब्ध असल्याने या रुग्णालयालाही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. या प्रस्तावासाठी आपण स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.





